शेंगदाण्याची आमटी
याच आमटीला काही भागात "झिरकं" किंवा "खळगुट"असे पण म्हणतात .अतिशय झटपट होणारी पौष्टिक व चवदार चविष्ट अशी ही आमटी नक्की करून पहा. भाकरी, पोळी, भात कशासोबतही छान लागते.
साहित्य...
१ वाटी... १५० मिली
*भाजलेले शेंगदाणे... 1/2 वाटी
*हिरवी मिरची... 5
*चिरलेली कोथिंबीर... 1/2 वाटी
*जिरे...1/4 टिस्पून
*मीठ... 3/4 टिस्पून
*तेल... 3 टेबलस्पून
*हळद... 1 टिस्पून
*मोहरी... 1/4 टिस्पून
*लिंबू रस... 2 टिस्पून
कृती...
*मिक्सरच्या भांड्यात भाजलेले शेंगदाणे, हिरवी मिरची, कोथिंबीर व जिरे घालून पाणी न घालता वाटून घ्या.
*नंतर त्यात दोन टेबलस्पून पाणी घालून छान एकजीव वाटून घ्या.
*एका लोखंडी कढईत तीन टेबलस्पून तेल घाला व मोहरी घालून फोडणी करून घ्या. नंतर हळद घालून शेंगदाण्याचे वाटलेले मिश्रण घाला व मंद आचेवर बाजूने तेल सुटेपर्यंत परतून घ्या.
*नंतर त्या कढईत दोन वाट्या पाणी व मीठ घालून तीन चार मिनिटे उकळू द्या.
*आपली शेंगदाण्याची आमटी तयार ...वरून लिंबूरस घालून गरम गरम आमटी सर्व्ह करा.
काकडी चा कोरडा
हा खास विदर्भातील पदार्थ आहे. हा कोरडा करण्यासाठी शक्यतोवर देशी काकडीच घ्या .अतिशय चवदार चविष्ट व प्रथिनांनी परिपूर्ण अशी ही भाजी आहे.
आपण याला लागणारी काकडी सालासकट किसून घेतली आहे.
पोळी, भाकरी कशा सोबतही छान लागते. डब्यात सुद्धा नेता येते.
साहित्य...
1 वाटी... 150 मिली
*काकडी सालासकट किसून... 3 वाटी
*बेसन... 1 वाटी
*तेल... 5 टेबलस्पून
*लसूण पाकळ्या... 7-8
*हळद... 1 टिस्पून
*तिखट... 1 टिस्पून
*मीठ... 1/2 टिस्पून
*मोहरी व जिरे... 1/4 टिस्पून प्रत्येकी
कृती...
*एका लोखंडी कढईत तेल तापवून मोहरी व जिरे घालून फोडणी करून घ्या.
*नंतर त्यात लसूण पाकळ्या चिरून घालून खमंग लालसर होऊ द्या. लगेच हळद व काकडी कीस घाला व नंतर वरून तिखट आणि मीठ पण घाला.
*मंद आचेवर हे सगळे मिश्रण परतत राहावे .काकडीला स्वतःचाच रस असतो व मीठ घातल्याने अजून पाणी सुटते.
*तीन-चार मिनिटे काकडी शिजल्यावर त्यात हळूहळू बेसन घालून छान एकत्र करा.
*त्यावर झाकण ठेवून मंद आचेवर शिजू द्या .अधून मधून हलवत राहा .दोन-तीन मिनिटांनी झाकण काढून पहावे, भाजी छान शिजली असेल.
*आपला काकडीचा कोरडा तयार आहे .वरून कोथिंबीर घालून सर्व्ह करा.
ज्वारी चे फुलके
हे ज्वारीचे फुलके अतिशय मऊ व चवदार लागतात. व डब्यात सुद्धा नेता येतात .सकाळी केलेले रात्रीपर्यंत मऊ राहतात.
करायला पण अतिशय सोपे आहेत.
साहित्य
*ज्वारीचे पीठ... 1वाटी
*गव्हाची कणिक...1 वाटी
*मीठ...पाव टीस्पून
कृती
*दोन्ही पीठ व मीठ छान एकत्र करून घ्यावे व त्यात हळूहळू पाणी घालून कणीक भिजवून घ्यावी .अंदाजे एक वाटी पाणी लागले होते.
*छान गोळा भिजवून, तीन-चार मिनिटे हाताने चुरून घ्यावा. *नंतर समान असे सहा ते सात गोळे करावे.
*पोळपाटावर लाटण्याच्या साह्याने, कोरडी कणिक लावून सहा ते सात इंचाची ची भाकरी लाटावी.
*गरम तव्यावर ही भाकरी टाकून लगेच दुसऱ्या बाजूने पलटावे.
*खालची बाजू व्यवस्थित शिजल्यावर, तवा बाजूला करून गॅसवर दुसऱ्या बाजूने ही भाकरी शेकून घ्यावी.
*आपल्या ज्वारीचा फुलका तयार.
*वाफ जाईपर्यंत डब्यात भरू नये.
*नंतर डब्यात भरली की अगदी सकाळच्या भाकरी संध्याकाळी सुद्धा मऊ राहतात.
गाजर टमाट्याची कोशिंबीर
साहित्य
*गाजर किसून... 2 वाटी
*टमाटे बारीक चिरून...1 वाटी
*लिंबू रस... 2 टीस्पून
*एक टेबलस्पून तेलाची मोहरी घातलेली फोडणी
*साखर व मीठ... 1/4 टीस्पून प्रत्येकी
*चिरलेली कोथिंबीर... 1 टेबलस्पून
कृती...
*वरील स
र्व साहित्य छान एकत्र करावे.
*आपली चवदार चविष्ट कोशिंबीर तयार.
Comments
Post a Comment